‘कुछ मिठा हो जाये…’ म्हणत प्रसाद ओकसोबत ‘हा’ अभिनेता वाढवणार ‘जिलबी’ची गोडी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा कायम चर्चेत असतो. कधी अभिनेता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून प्रसादने सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ चित्रपटांनंतर आता प्रसादने अलीकडेच ‘जिलबी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रसाद ओकने या चित्रपटाची घोषणा केली होती. घोषणेपासून या चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत असेल याबाबत उत्सुकता होतीच. आता या चित्रपटात कोण कलाकार दिसणार हे समोर आले आहे.

अभिनेता प्रसाद ओकने अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जिलबी’ या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटामध्ये कोण कोणते कलाकार दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आनंद पंडित मोशन पिक्चर निर्मित ‘जिलबी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक मजेशीर व्हिडीओ कलाकारांनी बनवला आहे. ज्यामुळे या चित्रपटात कोण कलाकार दिसणार हे समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळेसुद्धा दिसत आहेत.

चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आणि कला दिग्दर्शन कौशलसिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही. दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. चित्रपटात स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोन गोड माणसं एकत्र आल्यावर चित्रपटाचा ‘गोडवा’ नक्कीच वाढणार, असं नितीन कांबळे यांनी सांगितले. तसेच ‘जिलबी’मध्ये शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे,अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.