अधिपती दाखवणार अक्षराला घराबाहेरचा रस्ता; मालिकेत भुवनेश्वरीच्या सत्यामुळे येणार मोठा ट्विस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या नात्यावर भुवनेश्वरीच्या सत्याने मोठा घाला घातला आहे. मालिकेत अक्षराला भुवनेश्वरीच्या भूतकाळातील सत्य समजल्यानंतर अधिपतीचे मातृप्रेम तिच्यावर भारी पडताना दिसणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अधिपती त्याच्या मास्तरीण बाईंना हाताला धरून बाहेर काढताना दिसतोय. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून मालिकेच्या आगामी भागांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अधिपतीशी लग्न झाल्यानंतर अक्षराने मोठ्या प्रयत्नांनी तिचे सासरे चारुहास यांची वाचा परत आणली. त्यांच्या तब्येत सुधारणा झाल्याचे पाहून तिला फार आनंद झाला. दरम्यान सासऱ्यांच्या तोंडून भुवनेश्वरीच सत्य ऐकून अक्षराच्या पायाखालची जमीन सरकली. चारुहास यांनी अक्षराला भुवनेश्वरी ही अधिपतीची खरी आई नसल्याचे सत्य सांगितले. तसेच चारुहासच्या पत्नीचे आणि अधिपतीच्या खऱ्या आईचे नाव चारुलता असल्याचेही सांगितले. भुवनेश्वरीने पैशांसाठी सूर्यवंशींचं घर उद्धवस्थ केले आणि आता तिच्या कचाट्यातून केवळ अक्षरा अधिपतीला बाहेर काढेल असा त्यांना विश्वास वाटतो आहे.

भुवनेश्वरीच सत्य समजताच अक्षरा अधिपतीचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. मात्र आजारपणाचं खोटं नाटक करून भुवनेश्वरीने आधीच अधिपतीला जाळ्यात अडकवलेले असते. यामुळे सत्य समोर येऊनही अधिपती त्याच्या खोट्या आईच्या बाजूने उभा राहतो. सुर्यवंशी कुटुंबासमोर अक्षरा भुवनेश्वरीला खडसावत म्हणते कि, ‘तुमचं काम फक्त अधिपतीला सांभाळणं एवढंच होतं. पण, तुम्ही या घरात पाय रोवून सगळं बळकावलं’. यावर भुवनेश्वरी म्हणते कि, ‘ही काल आलेली पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते. याला काय अर्थ आहे? आता ना तुम्हाला आमची गरज आहे… ना या घराला’. हे ऐकून अधिपती संतापतो आणि रागाच्या भरात अक्षराचा हात धरून तिला घराबाहेर काढतो. हा विशेष भाग आज १७ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे.