अधिपती उचलणार मास्तरीण बाईंवर हात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठं वळण येणार


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. आता या मालिकेचे कथानक लवकरच मोठे वळण घेताना दिसणार आहे. मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहास यांची वाचा परतली असून अक्षरासमोर भुवनेश्वरीचं दडवून ठेवलेलं मोठं सत्य समोर येणार आहे. हे सत्य अक्षरा अधिपतीला सांगताच त्याचा राग अनावर होईल आणि तो मास्तरीण बाईंवर हात उगारताना दिसणार आहे.

सध्या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये चारुहास यांची वाचा परत येताच त्यांनी भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदाती आई नसल्याचं सत्य अक्षराला सांगितलं. आता अक्षरा भुवनेश्वरीचं सत्य अधिपती समोर आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत. यातील पहिलाच प्रयत्न तिच्या आणि अधिपतीच्या नात्यावर वार करणार आहे. या व्हायरल प्रोमोमध्ये सुरुवातीला अधिपती म्हणतोय कि, ‘आमच्या आईसाहेबांसारखी माया आजवर आमच्यावर कोणीच केली नाही’. तर यावर अक्षरा म्हणते कि, ‘ती माया नव्हती तो सूड होता’.

हे ऐकून अधिपतीचा पारा चढतो आणि तो म्हणतो कि, ‘तुमचा आता एक शब्द ऐकून घेणार नाही मी’. यावर अक्षरा त्याला निक्षून म्हणते, ‘ऐकावं लागेल. कारण आता मला सगळं कळलंय’. अधिपती तिला रागात विचारतो कि, ‘काय कळलंय..?’ तर अक्षरा सत्य सांगत म्हणते कि, ‘भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई नाहीयेत. यांच्यापासून दूर राहा. नाहीतर एक दिवस तुम्हाला त्या खरं जीवे मारतील’. अक्षराच हे बोलणं ऐकून अधिपतीला राग अनावर होतो आणि तो रागाच्या भरात तिच्यावर हात उचलतं म्हणतो, ‘मास्तरीण बाई…’. आता मालिकेतील या मोठ्या खुलास्यानंतर पुढे काय वळणं येणार..? आणि भुवनेश्वरीमूळे अधिपती आणि अक्षरा वेगळे होणार का..? हे पाहणे रंजक ठरणार आहे.