दिल्या घरी तू सुखी रहा!! लेकीच्या पाठवणीवेळी उदय टिकेकर झाले भावुक; Unseen व्हिडीओ आला समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्या विवाह सोहळ्याची विशेष चर्चा सुरु होती. अखेर हे जोडपं २५ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकलं. स्वानंदी आणि आशिषचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र मैत्रिणी तसेच सिने विश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. लग्नातील पाठवणी हा अत्यंत भावनिक क्षण असतो आणि नकळत यावेळी कायम धीराने घेणाऱ्या वडिलांचा देखील कंठ दाटून येतो.

स्वानंदीची पाठवणी करताना तिचे वडील अभिनेता उदय टिकेकर यांचंही असंच काहीसं झालं. सोशल मीडियावर स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्यातील एक Unseen व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसाठी बॅकग्राऊंडला दोघांनी स्वत:च्या आवाजात गायलेलं ‘तेरे हवाले करदिया…’ हे गाणं जोडण्यात आलं आहे. या व्हिडिओत स्वानंदीचा लग्नातील लूक, मंगळसूत्र आणि सप्तपदी घेतानाचे सुंदर क्षण पहायला मिळत आहेत. इतकेच नव्हे तर या व्हिडिओत लेकीची पाठवणी करताना भावुक झालेले उदय टिकेकर देखील दिसत आहेत.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची लेक आहे. लाडक्या लेकीच्या लग्नात टिकेकर जोडप्याने चांगली धमाल केली. पण पाठवणी करतेवेळी शेवटी हे जोडपं भावुक झाल्याचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळालं. स्वानंदीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.