हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाकारांचे आणि चाहत्यांचे नाते फार वेगळे असते. अत्यंत भावनिक दृष्ट्या ते एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यामुळे कलाकार मंडळी काही ना काही कारणामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उमा पेंढारकर. ‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण त्यांनतर उमाने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला आणि ती न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाली. मात्र नुकतेच तिने मिळवलेले यश आणि त्याबद्दलचा आनंद तिने आवर्जून चाहत्यांसह शेअर केला आहे.
उमा पेंढारकरचा पती न्यूझीलंडमध्ये स्थायिक असल्यामुळे तिने परदेश गाठलं आणि संसार थाटला. परदेशात जाऊनही उमा भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे. परदेशातही ती अनेक सण, उत्सव साजरे करताना दिसते. परदेशी गेल्यानंतर तिने कलाविश्वातून ब्रेक घेतला पण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीस येऊ लागली. या चॅनेलद्वारे उमा लोकांना मानसिक स्वास्थ्य, मेकअप, स्कीनकेअर याबाबत सल्ले देताना दिसते. तिच्या युट्युब चॅनेलचे नाव ‘U MAtter’ असे आहे. आनंदाची बाब अशी कि नुकतेच तिच्या युट्यूब चॅनलचे १ लाख सब्सक्रायबर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्त उमाला युट्यूबकडून सिल्व्हर बटण देण्यात आलं आहे. याविषयी तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
काही फोटो शेअर तिने लिहिलंय, ‘जेव्हा मला एखादी व्यक्ती विचारायची की उमा तू युट्यूबर आहेस ना..? तेव्हा पटकन मनात यायचं की अजून आपलं चॅनेल एवढं मोठं झालेलं नाही की आपण स्वतःला एक युट्यूबर म्हणवून घेऊ. पण आतापासून हे उत्तर बदलणार…कारण आता १०००० लोकांचा विश्वास, त्यांचा आशीर्वाद माझ्या चॅनेलबरोबर आहे. म्हणूनच आजपासून ऑफिशियली युट्यूबर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खरंतर गप्पा मारणे हा माझा आवडता छंद आणि त्यात मानसशास्त्र मध्ये मास्टर्स झाल्यामुळे वेगळा वेगळ्या विषयांवर मग ते मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य या सारख्या अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करणे ही तर फारच आवडीची गोष्ट. त्यातही एक क्लासिकल गायिका क्लासिकल नृत्य विशारद आणि अभिनेत्री असल्यामुळे मेकअप आणि स्किनकेअर, हेअरकेअर हे सुद्धा अगदीच आवडीचे विषय. म्हणून २०२०ला ठरवलं की युट्यूब चॅनेल काढायचं. मग सुरुवात करायची तर चांगल्या मुहूर्तावर करूयात म्हणून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चॅनेलचा श्रीगणेशा केला’.
‘चॅनेल सुरू करायच्या आधी मी (मानसशास्त्र) psychology सेशन्स घेताना कायम म्हणायचे remember ‘You’ always always matter… आणि यातूनच चॅनेलचं नाव ठेवलं..U MAtter (You Matter) त्यात पुन्हा UMA कॅपिटलमध्ये ठेवून क्रिटीव्हिटी दाखवायचा प्रयत्न होता. पण आज हे छोटं चॅनेल एक खूप मोठा परिवार झालाय. माझा स्वतःचा हक्काचा परिवार. प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं की तो चंदेरी आकडा १००००० दिसावा ज्यानंतर खुद्द युट्यूबकडून कौतुकाची थाप म्हणून सिल्व्हर प्ले बटण दिलं जातं. आज मी पण त्या silver button ची मानकरी झालेय. त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मेहनत करत राहिलो की सगळी स्वप्न पूर्ण होतात त्याचीच ही एक प्रचिती आहे.. हा प्रवास खूप मोठा आहे आणि आता कुठे मजेशीर भागाला सुरुवात झालेय… अजून खूप प्रवास करत पुढे जायचंय.. पण तूर्तास थोडं थांबून आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच सदैव पाठीशी असूदेत.. मनापासून खूप धन्यवाद..“श्रीराम” ‘