पुष्कर जोग घडवणार ‘मैत्रीची सुंदर सफर..’; आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’च्या भव्य कटआऊटचे अनावरण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट आहे. त्यामुळे घोषणेपासूनच ‘मुसाफिरा’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार..? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. तर आता प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ढोल ताशाच्या गजरात ‘मुसाफिरा’च्या २० फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरण करत हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. मैत्री हा विषय प्रेक्षकांसाठी कायम जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. त्यात ‘मुसाफिरा’देखील असाच मैत्रीवर बेतलेला चित्रपट आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गुझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना पुष्कर जोग म्हणाला कि, ‘स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान ‘मुसाफिरा’ला मिळाला आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे’.

पुढे म्हणाला, ‘हा चित्रपट केवळ तरुणाईसाठी मर्यादित नसून हा चित्रपट प्रत्येक वयोगटासाठी आहे. हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा चित्रपट जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे. आजच्या धकाधकीच्या काळात मित्रपरिवारापासून दूर गेलेल्या मित्रमैत्रीणींना पुन्हा एकत्र आणणारा ‘मुसाफिरा’ आहे. यात मैत्री आहे, धमाल आहे, भावनिक बंध आहेत आणि भांडणेही आहेत. कलाकारही उत्तम आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा मराठीत पदार्पण करत आहे. ”मुसाफिरा” प्रेक्षकांना मैत्रीची सुंदर सफर घडवणार, हे नक्की!!’