‘मुक्ताई’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा उलघडणार मोठ्या पडद्यावर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते कायम वेगवेगळ्या कलाकृती मोठ्या पडद्यावर घेऊन येत असतात. यामध्ये गेल्या काही काळात ऐतिहासिक चित्रपट, बायोपिक यांचे प्रमाण वाढले आहे. लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मूळे प्रचंड चर्चेत असताना त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट म्हणजे संत ज्ञानेश्वरांची ‘मुक्ताई’. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे.

इतिहासातील अनेक सुवर्ण पाने रुपेरी पडद्यावर उलघडणारे दिग्पाल लांजेकर आता आगामी चित्रपटातून श्री संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताई यांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. या चित्रपटात ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिवाय काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर रिलीज झाले होते. जे सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहे.

या चित्रपटाच्या मुहुर्तावेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर स्वतः उपस्थित होते. त्यांनी पूजा विधी करत चित्रपटाच्या शूटिंगसाठी पहिला क्लॅप घेतला आणि शूटिंगला सुरुवात केली. मुहूर्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘ज्ञानेश्वरांच्या दैवी कुटुंबाची कथा… संत ज्ञानेश्वरांची || मुक्ताई ||चित्रपटाचा मुहूर्त संपन्न!’ एए फिल्म्स प्रस्तुत श्री संत ज्ञानेश्वरांची ‘मुक्ताई’ हा चित्रपट येत्या नव्या वर्षात जून २०२४ मध्ये प्रदर्शित होईल असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. अद्याप या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार हे समोर आलेले नाही.