रोल छोटा, इम्पॅक्ट मोठा!! ‘अ‍ॅनिमल’मधील उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेवर मराठी कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडे संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या बॉलिवूड चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपट रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. शिवाय या मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांची विशेष भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेचा स्क्रीन टाइम कमी असला तरीही प्रभावी आहे. उपेंद्र यांच्या नुसत्या एंट्रीने थिएटर गाजवले आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यावर अनेक मराठी कलाकार, निर्मात्यांनी फोन करून कौतुक केल्याचे उपेंद्र यांनी म्हटले आहे.

अलीकडेच एका नामवंत वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेता उपेंद्र लिमये म्हणाले कि, ‘ ”अ‍ॅनिमल” पाहिल्यावर मला संदीप पाठकने फोन केला आणि तो तब्बल अर्धा तास माझ्याशी बोलत होता. तो म्हणाला, अरे उप्या तो चित्रपट पाहून मी कुठेतरी मागे पडलोय असं मला वाटलं. संदीपने अत्यंत प्रांजळपणे त्याला एकाप्रकारचं दडपण (कॉम्प्लेक्स) आल्याचं मान्य केलं आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं मला फारचं कौतुक वाटलं. त्याची प्रतिक्रिया आणि आवर्जून केलेला फोन ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहील. याशिवाय आणखी एका प्रतिक्रियेविषयी उपेंद्र यांनी सांगितले.

‘दुसरी एक प्रतिक्रिया मला एका निर्मात्याने दिली होती. ती अशी होती की, अरे तुझी लोकप्रियता एवढी असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कलाकाराच्या अभिनयाने लोक आनंदी होतात हा भाग वेगळा… पण, तुझ्या नुसत्या एंट्रीनेच प्रेक्षक वेडे होतात. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी शॉकिंग होत्या असं तो म्हणाला. अशा विविध प्रतिक्रिया मला कलाविश्वातून आल्या. एकंदरच आयुष्यात कधीही नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून जायचं नसतं आणि चांगल्या सकारात्मक प्रतिक्रियांनी स्वत:ला मोठं समजायचं नसतं. जे कौतुक करतात त्यांचा मी कायम आभारीच आहे’, असं उपेंद्र यांनी म्हटले.