हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| आपण अनेकदा रस्त्यावर प्राण्यांचे ऍक्सिडेंट झाल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील. रस्त्यावर गाडी चालवताना अचानक एखादा प्राणी गाडीसमोर आला त्याला धडक लागली आणि तो जखमी झाला किंवा मेळा तर कित्येक वाहन चालक थांबायचे कष्ट सुद्धा घेत नाहीत. पण अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेच्या कृतीने मात्र सर्वांचे मन जिंकले आहे. त्याच्या सतर्कपणामुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचला आहे. या घटनेचा उलघडा स्वतः अभिनेत्याने सोशल मीडियाद्वारे केला आहे.
उत्कर्ष शिंदेने हि व्हिडीओ पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोबत लिहिलंय, ‘ ”फायटर”वर संक्रांत आली होती का? माहिती नाही पण ”संकट” नक्कीच आलं होतं… छत्रपती संभाजी नगरमध्ये सामाजिक रित्या माझा वाढदिवस साजरा करून भल्या पहाटे मुंबईसाठी परत निघालो. गरमा गरम हुरडा खात, गार वारा कापत प्रवास सुरू होता. हायवेवर एका मागोमाग भरधाव वेगाने वाहने धावत होती आणि तितक्यात नगर येता येता रस्त्याच्या मधोमध दिसला एक चिमुकला ”फायटर”. एका पायाने लंगडत हायवेवर त्याच्या आईला शोधत सैरावैरा जीवाच्या आकांताने मधोमध पळणार, घाबरलेलं, वाट विसरलेलं एक चिमुकलं कुत्र्याचं पिल्लू. आमच्या गाडी समोर ”फायटर” दिसताच आम्ही कार कशी बशी कंट्रोल करत रस्त्याच्या कडेला थांबवली. खरा काउंटडाऊन सुरू झाला होता तो तेव्हाच. भीती होती ती आता मागून दुसऱ्या कोणत्या तरी गाडी खाली त्याचा जीव जाऊ नये याची’.
‘तसाच गाडीतून मी उतरुन उलट हायवेवर धावत रस्त्याच्या मधोमध ”फायटर”च्या मदतीस पोहोचलो, त्याला उचललं. पाहिलं तर एका पायाला जखम असल्याने तो लंगडत होता. विचार केला याची आई जवळ आसपास असेल. याला इथेच झाडात सोडू म्हणजे हा सुखरुप राहील. पण का जाणे ते पिल्लू केविलवाण्या नजरेनं बघू लागलं. एक क्षण विचार केला आणि पुन्हा त्या पिल्लाला उचललं. गाडीत बरोबर घेऊन आलो. त्याला दुसरं कुठे लागलं नाहीना? चेक करत करत. तो भूकेला असेल, तहान लागली असेल, आधी याला एनर्जी मिळावी म्हणजे हा स्थिर होईल या विचाराने. त्या पिल्लाला घेऊन पुढे एका धाब्यावर थांबलो, त्याला पाणी पाजल- बिस्कीट खाऊ घातलं. त्याच्या पायाला औषध लावलं आणि काही काळ आम्ही गुळाचा चहा घेत तिथे थांबलो. तेथील काही चाहत्यांनी सेल्फी घेतले. काहींनी त्या पिल्लाबद्दल विचारपूस केली’.
‘मांडीत बसलेला जखमी पिल्लू पाहून तेथील एकाने मी हे पिल्लू घेऊ का..? मी त्याचा सांभाळ करतो सर म्हणत मायेने त्याला जवळ घेतलं आणि त्याची पुढील जबाबदारी घेतली आणि मनात विचार आला… आता हे पिल्लू जगेल पुढच्या कैक संक्रांती बघण्यासाठी. आजच्या या संकटाला हरवून एका ”फायटर”सारखा. निरोप घेतला, निघालो पण या घटनेतून मी एक गोष्ट नक्कीच शिकलो. मी का बरं हे टेन्शन मागे घेऊ..? माझं थोडीचं हे काम आहे..? मला काय गरज..? आपण बऱ्याचदा हे विसरून जातो की आपल्या छोट्याश्या मदतीने कोणावर ओढावणारी वाईट गोष्ट टळू शकते. इट्स अ सर्कल. तुम्ही मदत करा कोणाची तरी तुमची मदत करायला नक्कीच कोणीना कोणी येईलच. आज तिळगुळ देऊन फक्त वरून गोड गोड बोलायचं नाही तर जिथे जाऊ तिथे गोडवा पसरवायचा प्रयत्न करायचा’.