‘संवेदनशील.. नीडर.. रोकठोक व्यक्तिमत्व..’; उत्कर्ष शिंदे ‘या’ अभिनेत्याला मानतो गुरुस्थानी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात उत्कर्ष शिंदे हे नाव प्रचंड चर्चेत आहे. संगीत कलेचा वारसा लाभलेल्या शिंदे घराण्याचा हा लेक केवळ गायक नव्हे तर एक उत्तम अभिनेता, संगीतकार आणि इंटरटेनर सुद्धा आहे. त्यामुळे उत्कर्षच चाहता वर्ग फार मोठा आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून उत्कर्ष घराघरांत पोहचला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहू लागला. दरम्यान, नुकतीच उत्कर्षने मराठी अभिनेता जितेंद्र जोशीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने जितेंद्रला ‘गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती’ म्हणून संबोधले आहे.

हि पोस्ट शेअर करताना उत्कर्ष शिंदेने लिहिलंय, ‘निसर्ग तुमच्या उत्कर्षासाठी आपोआप गोष्टी घडवतो असं माझं मत आहे. चार्ल्स डार्विनने ‘सक्षम ते जगतील’ “survival of fittest” असं सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्या वेळच्या पर्यावरणास जुळवून घेण्यास सक्षम असतील तेच सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले. माझ्या आयुष्यातही असाच एक चार्ल्स डार्विन आहे. गुरुस्थानी ठेवावी अशी व्यक्ती. ”द जितेंद्र जोशी”, “मराठीची समज, संवेदनशील अभिनेता, नीडर वक्ता, रोकठोक व्यक्तिमत्व”; आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती, मग सेक्रेट गेम्स असो किंवा नुकताच आलेला गोदावरी, नाळ २ असो.

मराठी सिनेविश्वाला नेहमी त्याच्या अभिनयातून, गीतातून, कवितांमधून वेगळं काही तरी देणारा अवलिया. माझ्यासाठी कलाविश्वात गुरुस्थानी असलेला कलाकार, व्यक्तिमत्व म्हणजे “द जितेंद्र जोशी.“ नेहमी भेटल्यावर मोठ्या भावाप्रमाणे आधी काळजीपोटी माझ्या खांद्याच्या झालेल्या दुखापतीची विचारपूस करणारा. नुसती विचारपूस नाही तर स्वतः शोल्डर मूवमेंट स्ट्रेंथट्रेनिंग करून घेणारा. उत्कर्ष, तू आता अभिनय क्षेत्रात आला आहेस, खूप काम कर, कामात मज्जा-आनंद घे; जसं चार्ल्स डार्विन सजीवांबद्दल सांगतात’.

‘जगण्याच्या ह्या स्पर्धेत जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात. ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव तग धरून राहतो आणि तोच जीव टिकतो. कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असेच जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. असाच काही मला नेहमी नकळतपणे गप्पा मारत मार्गदर्शन करणारा, मराठी सिनेमाची दिशा समजाऊन सांगणारा, कॉम्पिटिशन स्ट्रगल हार्डवर्कबद्दल मार्गदर्शन करणारा, प्रेक्षकांच्या आवडी निवडीबद्दल सतर्कता ठेवत सांगणारा. अभिनय क्षेत्रात दिशा, कन्सिस्टन्सी (नियमितपणा), ह्याचं महत्त्व सांगत संस्कार करणारा, सुतार पक्ष्याचं उदाहरण देत “लगे रेहनेका भाई, बाकी सब हो जाता है”, म्हणजेच सगळं विसरून, कामात झोकून द्यायचं; मग स्वतःची त्या झाडात सुंदर कुपी तयार होतेच. आकाशाला गवसणी घातलेला जमिनीवरचा माणूस, असा हा माझा गुरुस्थानी असलेला मोठा भाऊ, माझा चार्ल्स डार्विन “जितू दादा”.’ उत्कर्षची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.