हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी ओळखली जातात. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले. गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून विविध ढंगाच्या भूमिका साकारत त्यांनी मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. जितका उत्तम नट तितकाच उत्तम वक्ता म्हणून वैभव मांगले यांच्याकडे पाहिले जाते. अनेकदा समाजातील वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे भाष्य करणाऱ्या वैभव मांगलेंच्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सध्या बॉक्स ऑफिसवर संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि अभिनेता रणबीर कपूर अभिनित ‘अॅनिमल’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सर्व सीमा तोडून दाखवण्यात आलेली हिंसा आणि विचित्र बोल्ड सीन्समुळे अनेकांनी या सिनेमावर टीका केली. केवळ प्रेक्षक नव्हे तर समीक्षकांनी देखील चित्रपटातील अशा अनेक दृश्यांवर आक्षेप घेतला. मात्र तरीही या चित्रपटाला मिळणार प्रतिसाद अगदी थक्क करणारा आहे. दरम्यान मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी अॅनिमल’ चित्रपटासंदर्भात एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये वैभव मांगले यांनी लिहिलं आहे कि, ‘ ”अॅनिमल” आणि ”अल्फा मेल” या दोन गोष्टींआडून अनेक गोष्टींचे समर्थन दिग्दर्शकाने केले आहे जे खूप घातक आहे. (उदा. हिंसा आणि लैंगिकता) असे वाटते का..?’ वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केलेल्या प्रश्नावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने या पोस्टवर कमेंट करताना लिहिलंय कि, ‘हो नक्कीच घातक आहे. कारण, नुकत्याच तारुण्यवस्थेत पदार्पण केलेल्या मुला- मुलींसाठी असे चित्रपट घातक आहेत’. तर काहींनी ‘सेन्सॉरने या चित्रपटाला मान्यता कशी दिली..?’ असा सवाल विचारला आहे.