ही प्रथा कुठून सुरू झाली..? वैभव मांगले यांच्या संतप्त फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. केवळ मनोरंजन विश्वात नव्हे तर जगभरात सुरु असलेल्या गोष्टींचा आढावा घेत ते व्यक्त होताना होताना दिसतात. त्यामुळे केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर सोशल मीडियावर त्यांच्याकडून शेअर केल्या जाणाऱ्या पोस्टसाठीदेखील ते कायम चर्चेत असतात.

अशीच एक पोस्ट अभिनेते वैभव मांगले यांनी शेअर करत सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे. आजतायागत वैभव मांगले यांनी अभिनयाबरोबर सामाजिक विषयांवरदेखील उघडपणे आपले मत प्रकट केले आहे. आजही त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी नवरात्र उत्सवाशी संबंधित आहे. नवरात्र संपली असली तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहिल्याने मनातली खदखद व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आजच्या पिढीला एक संतप्त सवाल केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून विजयादशमीदिवशी रात्री उशिरा देवीचे विसर्जन केले जात असल्याचे दिसत आहे. याच विषयावर बोट ठेवत वैभव मांगले यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ‘आता दुर्गेच्या विसर्जनाच्या दिवशी रात्री ११ पर्यंत गरबा खेळून नंतर वाजत गाजत विसर्जनाची प्रथा कुठून सुरू झाली…?’ असे म्हणत वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर संतप्त सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्नावर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यातील अनेकांनी मत व्यक्त करताना संताप व्यक्त केला आहे.