‘गुलाबजाम 2’मधून सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट; सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार ‘हा’ अभिनेता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘गुलाबजाम’ हा चित्रपट अत्यंत वेगळ्या विषयामुळे प्रचंड गाजला होता. साखरेच्या पाकात डुबुक बुडणारा आणि जिभेवर ठेवताच मन आनंदित करणारा ‘गुलाबजाम’ त्याच्या पाककृतीसह प्रेक्षकांच्या मनात उतरला. एक वेगळा विषय आणि वेगळी मांडणी या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. शिवाय सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या भूमिका अव्वल साकारल्या होत्या. यांनतर आता ‘गुलाबजाम २’ येतोय. पण यावेळी सिद्धार्थ नव्हे तर अन्य अभिनेता सोनाली कुलकर्णीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘गुलाबजान’ हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कामगिरी केली होती. या भव्य यशानंतर आता सचिन कुंडलकर यांनी ‘गुलाबजाम २’ची घोषणा केली आहे. यावेळी चित्रपटात अत्यंत मोठा बदल झाल्याचे दिसणार आहे. तो बदल असा कि, ‘गुलाबजाम २’मध्ये सिद्धार्थ चांदेकरच्या जागी अभिनेता वैभव तत्ववादी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार आहे. त्यामुळे एक फ्रेश जोडी आणि खमंग गोडवा घेऊन ‘गुलाबजाम’चा सिक्वेल येतोय.

‘गुलाबजाम’ चित्रपटाला सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या जोडीने चांगले यश मिळवून दिले. त्यामुळे सिद्धार्थचा पत्ता कट केल्याने अभिनेता वैभव तत्ववादीवर मोठी जबाबदार आली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कसोटीवर खरं उतरण्यासाठी वैभव आतापासून ‘गुलाबजाम २’मधील भूमिकेसाठी मेहनत घेतो आहे. आता वैभव तत्ववादी त्याच्या अभिनयाच्या जोरावर ‘गुलाबजाम २’मध्ये काय जादू दाखवणार..? याबाबत मोठी चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळते आहे.