सुमितला येतेय वनिताची आठवण; ‘लवकर परत ये…’ म्हणत शेअर केली क्युट पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रकाशझोतात आलेली वनिता खरात बघता बघता प्रेक्षकांच्या घरात आणि मनात एक अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. शोमध्ये विविध स्कीटदरम्यान वनिता साकारत असलेली पात्रे हि नेहमीच प्रेक्षकांना भावतात. मग ती मामी असो, सासूबाई असो किंवा खरात काकू. वनिताचा चाहता वर्ग फार मोठा असून तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोवर्स आहेत. नुकताच १९ जुलै रोजी वनिताचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त तिच्या पतीने म्हणजेच सुमितने एक पोस्ट शेअर केली होती.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धीझोतात आलेली वनिता खरात २ फेब्रुवारी २०२३ रोजी तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ अगदी परी वेडिंगचे फोटोदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दोघांचेही एकमेकांवर असलेले प्रेम ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आले आहेत. मग वाढदिवसाचे निमित्त हुकून कसे चालेल. त्यात वनिता तिच्या व्हॅकेशन टूरवर असल्यामुळे सुमित तिला फार मिस करतोय.

तर गणिताच्या वाढदिवशी सुमितने त्याच्या भावना व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात त्याने त्यांच्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात सुमित आणि वनिता यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. सॉसबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘माझ्या जीवनात आनंद आणणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! लव्ह यू वनी.. तुझे यापुढील दिवस, वर्ष आणि आयुष्य खूप चांगले जावो. तुझी खूप आठवण येतेय. लवकर परत ये’. यावर वनिताने कमेंट करत लिहिले, ‘माझेही तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे’. सध्या वनिता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमबरोबर अमेरिकेत व्हॅकेशनसाठी गेली आहे. पण लवकरच ते परतणार आहेत आणि हा शो पुन्हा सुरु होणार आहे.