हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हि घोषणा केल्यानंतर विविध स्तरांवरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. कलाविश्वात अनेक मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी बोलत आहेत. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी देखील अशोक सराफ यांचे अभिनंदन करताना एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘प्रिय भाई (अशोक सराफ) अभिनेते म्हणून मोठे आहातच, पण माणूस म्हणूनही खूप मोठे आहात. फक्त एकच नाटक.. ”अनधिकृत” तुमच्यासह करण्याचं भाग्य मला मिळालं. नाटक अल्पजीवी ठरलं पण माणुसकीचे बंध मात्र आजपर्यंत टिकून आहेत. माझ्या अपघातानंतर एवढ्या कार्यबाहुल्यातूनही तुम्ही आणि निर्मितीताई मला नाशिकला भेटायला आलात… मला धीर दिलात… तुम्ही स्वतः एका मोठ्या अपघाताला सामोरी गेला होतात… ते अनुभव तुम्ही सांगितले आणि मीही यातून सुखरूप बाहेर पडेन अशी खात्री दिलीत. आपल्या ”अनधिकृत” नाटकात तुमच्या पात्राला एक विचित्र आजार असतो… त्याचं वय हळूहळू मागे जातं.. म्हणजे ५०शीत माणूस शेवटी दीडदोन वर्षांचा होतो.. तुम्ही काय अफलातून तो बदल दाखवत होतात भाई…’
‘त्या नाटकातला तुमचा अभिनय हा आम्हा नवशिक्यांसाठी एक कार्यशाळा होती… दुर्दैवाने ते नाटक चाललं नाही… पण माझ्यासाठी ते नाटकं भाग्याचं ठरलं… तालमी दरम्यांची शिस्त, मुख्य म्हणजे वेळेवर येणे, मोबाईल बंद ठेवणे.. इतर अनावश्यक बडबड करणाऱ्या कलाकारांना शांत राहण्याचं महत्व पटवून देणे (अरे आपली एनर्जी वाचवा रे, हे तुमचं वाक्य ).. आपल्या भूमिकेचा बारकाईने अभ्यास करणे… किती आणि काय काय सांगू… खूप वर्ष झालीत पण अनधिकृत नाटक माझ्यासाठी आजही एक अधिकृत आठवणीचा खजिना आहे. तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज जाहीर झाला… मनापासून अभिनंदन…पुरस्कार आज जरी जाहीर झाला असला तरी तुम्ही आम्हा सगळ्यांचे महाराष्ट्र भूषण होतात… आहात आणि जोपर्यंत मराठी अभिनयसृष्टी आहे तोपर्यंत राहालच… भाई तुमचं खूप खूप अभिनंदन’. वर्षा दांदळे यांची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.