‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेत बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची एंट्री; फर्स्ट लूक समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप ही सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत ती अनेकदा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत तिने काही महिने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती पुन्हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘कलर्स मराठी’वरील अत्यंत लोकप्रिय अध्यात्मिक मालिका ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेतून वीणा जगताप अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आतापर्यंत तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा हि भूमिका फार वेगळी आणि आव्हानात्मक असणार आहे. या मालिकेत वीणा कथानकाच्या गरजेनुसार ‘योगदायिनी पार्वती माता’ हि भूमिका साकारताना दिसणार आहे. या नव्या भूमिकेतून ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय असे म्हणता येईल. वीणाचा या भूमिकेतील फर्स्ट लूक समोर आला असून प्रेक्षक तिला या मालिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

अभिनेत्रीचे मालिकेमधील लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तीचा लूक एखाद्या वृद्ध स्त्रीसारखा आहे. त्यामुळे ही भूमिका विणासाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसणार आहे. म्हणूनच या भूमिकेत वीणाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणाने मनोरंजन विश्वातील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर अभिनेत्री ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. ज्यामध्ये तिची आणि शिव ठाकरेंची केमिस्ट्री प्रचंड चर्चेत राहिली. यानंतर ‘आई माझी काळुबाई’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमध्येदेखील वीणा महत्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसली होती.