हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राचे राजकारण एखाद्या मनोरंजनाचा भाग आहे का काय असेच वाटू लागले आहे. रोज नवी नाटिका आणि रोज नवे विषय, नवी चर्चा. नुकताच २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंड केले आणि शिंदे- फडणवीस सरकारसोबत हात मिळवणी केली. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. यावर अनेक नेते मंडळी आणि मनोरंजसृष्टीतील कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर आता अभिनेते सयाजी शिंदे यांनीही राजकीय पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर करत जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सयाजी शिंदे काही गावकऱ्यांसोबात दिसत आहेत. त्यांच्यामागे अतिशय घनदाट झाडी दिसत आहे. या व्हिडीओतून सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधत म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातल्या सगळ्यांना शुभ सकाळ. उठलात..? आता सगळ्यांनी झोपा आणि कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका. जर कुठल्या पक्ष्याला फॉलो करायचंच असेल, तर घुबडाला करा’. सयाजी शिंदे यांच्या या मजेशीर व्हिडीओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सयाजी शिंदे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी सयाजी शिंदे यांच्या मतासोबत आपली सहमती दर्शवली आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एकाने म्हटले आहे कि, ‘आपला एकच पक्ष… झाडांवर लक्ष’. तसेच आणखी एकाने म्हटले कि, ‘मैं सयाजी शिंदे गॅरंटी के साथ में….Hmmmmmmmmmmmmmmmmmmmmm’. आणखी एकाने लिहिले, ‘एकदम बरोबर आहे साहेब… मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.. आतापासून आपला एकच पक्ष…. वटवृक्ष’