हिच्या बरोबर कसं जगणार..? बायकोच्या फोटोसोबत विजू मानेंनी शेअर केलेलं ‘ते’ कॅप्शन चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनुभव, किस्से आणि वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या पोस्ट कायम चर्चेत येत असतात. आज विजू माने यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विजू माने यांनी पत्नी अनघा माने यांचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अनघा त्यांच्या लग्नाच्या अल्बमसोबत दिसत आहेत.

विजू माने यांनी हा फोटो शेअर करत लिहिलंय की, ‘इतकं जुनं झालंय आमचं लग्न. कधी होईल? होईल का? निभवेल का? सगळ्या प्रश्नांवर उत्तरं दिली अगदी शाळेतल्या प्रश्नपत्रिकेसारखीच. सुरुवातीलाच प्रचंड खाडाखोड… मला ‘एका वाक्यात उत्तरं’ हवी होती, तिला ‘संदर्भासहीत स्पष्टीकरण’. मी ‘कवितेतत’ रमलेला… ती माझ्या ‘गाळलेल्या जागा’ भरत बसली होती. ‘थोडक्यात उत्तर’ देऊ म्हटलं तर तिचा अख्खा ‘निबंध’ तयार असायचा. माझ्या ‘समानार्थी’ शब्दांना कायम तिच्या ‘विरुध्दार्थी’ शब्दांना भिडायचं होतं. माझे सगळे ‘कर्तरी, कर्मणी’ प्रयोग तिने ‘भावे’ मानून घेतले’.

पुढे लिहिलंय, ‘काही केल्या ‘जोडी’ जुळता जुळेना. आणि शेवटी ‘पुढीलपैकी एक पर्याय’ निवडायची वेळ आली…मग शांतपणे विचार केला साला हिच्या बरोबर कसं जगणार??? पण हिच्याशिवाय मरण्यापेक्षा पहिला पर्याय बेटर (better) वाटला. पैकीच्या पैकी कुणालाच मिळत नसतात…. पण काही गोष्टी ‘OPTION’ला (पर्यायी) टाकल्या की ‘Distinction’ (डिस्टिंक्शन) अवघड नसतं. मला विचारा १४ वर्षांच्या अनुभवावरून सांगतोय. आम्ही अपूर्ण असलो तरी परिपूर्ण जोडपं आहोत…अनघा विजू माने तुला लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा…परीक्षा संपलेली नाही….परीक्षा संपत नसते’. विजू माने यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.