मालिकेचा निरोप घेताना अभिनेता झाला भावुक; स्वामींचे आभार मानत म्हणाला, ‘एक अखंड आयुष्य..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी अध्यात्मिक मालिका आहे. या मालिकेतून स्वामी समर्थांचा जीवन अध्याय पाहता येत असल्यामुळे मालिकेचा प्रेक्षकवर्ग भलामोठा आहे. स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपले पात्र पूर्ण ताकदीनिशी साकारले आहे. त्यामुळे प्रेक्षक या कलाकारांचे नेहमीच कौतुक करत असतात. नुकतीच या मालिकेतील एका अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने स्वामी समर्थांचे, मालिकेच्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

अभिनेता विकास पाटील हा मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. विकास पाटील हा ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेमध्ये ‘स्वामीसुत’ हि भूमिका साकारताना दिसला. नुकताच या मालिकेच्या स्वामीसुत पर्वाचा शेवटचा भाग प्रसारित झाला. ज्यामुळे येत्या भागांमध्ये विकास आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार नाही. त्यामुळे या मालिकेचा निरोप घेताना भावुक झालेल्या विकासने हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मालिकेच्या शूट दरम्यानचे काही फोटो शेअर करत लिहिलंय, ‘स्वामीसुत पर्वाचा शेवटचा भाग आज प्रदर्शित होतोय.. खूप काही मिळालं या प्रवासात !! स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये. इतक्या कमी कालावधीत एक अखंड आयुष्य जगल्याचा अनुभव मिळाला, प्रत्येक पात्र तुम्हाला काही ना काही देऊन जात असतं’.

‘पण या पात्राने जगणं शिकवलं, गुरुंप्रती नितांत श्रद्धा ठेवणं शिकवलं, कठीण काळात जराही न डगमगता आपल्या गुरूंवर अढळ विश्वास ठेवून लढणं आणि पुढे जात राहणं शिकवलं, संसारात राहूनही वैराग्य कसं सांभाळावं हे शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” ही आयुष्यभर पुरणारी शाश्वती मिळाली!! माझ्या पूर्वपुण्याईनेच “स्वामीसुत” साकारायची संधी मिळाली. ही संधी मला दिल्याबद्दल वाहिनी आणि टीमचेचे मनापासून आभार. तुम्हा सर्व मायबाप प्रेक्षकांचे आभार ज्यांनी या पात्रावर भरभरून प्रेम केलं. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या पात्रासोबत’.