तुमच्या मोदकाचे आकार चुकतात..? तर विशाखा सुभेदारांनी दिलेला सल्ला देईल दिलासा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पा येणार म्हणजे त्याचे कोडकौतुक केले जाणार, त्याला गोड धोड खाऊ देणार. आता बाप्पा आणि गोड यांचं नातं किती घनिष्ट आहे ते काही सांगायला नको. बाप्पाला मोदक सर्वाधिक प्रिय आहेत. त्यामुळे बाप्पा आला कि मग सर्वत्र खमंग सारणाचा सुगंध आणि तुपाची धार सोडलेला मोदक सगळ्यांनाच आकर्षित करू लागतो.

मोदक बनवणं सोप्प वाटत असलं तरीही अजिबात सोप्प नाही बरं का. काहींना ते जमतात, तर काहींना जमत नाहीत. कुणाच्या मोदकाचं सारण बिघडतं, तर कुणाला मोदकाचे आकार जमत नाहीत. पण यंदा कुणाचेही मोदक चुकू नयेत म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारने एक खास टीप दिली आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत विशाखा सुभेदार यांनी लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्याही घरी गणपती असतो. त्यामुळे दरवर्षी त्या घरच्या घरी नैवेद्य आणि मोदक बनवतात. तर आता बाप्पाचे आवडते मोदक कसे बनवायचे..? हे त्यांनी सांगितलं आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले कि, ‘आमच्या घरी गणपतीला जवळपास १०० मोदक असतात आणि सगळेजण त्यावर ताव मारतात. आम्ही घरीच मोदक करतो. मोदकाच्या ज्या पाकळ्या असतात त्या करण्याच्या भानगडीत पडू नका. त्या चांगल्या आल्या किंवा नाही आल्या याचा काही फरक पडत नाही. शेवटी मोदक उकडल्यावर कसा दिसतो यापेक्षाही तो कसा लागतो याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे सारण उत्तम जमलं आणि पाकळ्या थोड्याशा इकडे तिकडे झाल्या तरीही आपल्या सगळ्यांची भावना इतकी भक्तीमय असते की तो मोदक गोडच लागतो’. विशाखा यांच्या बोलण्याने ज्यांना मोदकाचे आकार प्रॉपर जमत नाहीत त्यांना मात्र दिलासा मिळाला आहे इतकं नक्की.