राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीनिमित्त खास भेट; अभिनेत्री म्हणाली, ‘एक मनसे कार्यकर्ती म्हणून…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात दिवाळीची धामधूम पहायला मिळत आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, पणत्यांची आरास, लाईटिंगची तोरणं, फटाके, फराळ, गोडधोड.. अशी नुसती चंगळ सुरु आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांसाठीच दिवाळी फार आनंददायी आणि उत्साहाचा सण असतो. जो तो आपापल्या परीने दिवाळी साजरी करतो. कुणी नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना घरी बोलावून दिवाळी साजरी करतं. तर कुणी भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील कलाकार मंडळींना दिवाळीनिमित्त खास भेट पाठवली आहे. ज्यामध्ये विशाखा सुभेदाराचा समावेश आहे.

दरवर्षी राज ठाकरे त्यांच्या निकटवर्तीयांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवत असतात. यामध्ये नातेवाईक, मित्र मंडळी, कार्यकर्ते आणि मराठी कलाकार मंडळींचा समावेश असतो. यंदाही राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त अनेक कलाकार मंडळींना भेटवस्तू पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी अभिनेत्री विशाखा सुभेदारलादेखील दिवाळीची भेट पाठवली आहे. ज्यामध्ये फराळ, चांदीचा दिवा, मेणाचे दिवे अशा वस्तूंचा समावेश आहे. या भेटवस्तूंबरोबर राज ठाकरे यांनी शुभेच्छा देणारी एक खास नोटही पाठवली आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदाराने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल च्या माध्यमातून राज ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या दिवाळी भेटचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये तिने राज ठाकरे यांचे आभार मांडले आहेत. हा फोटो शेअर करत विशाखाने लिहिलं आहे कि, ‘साहेब मनापासून धन्यवाद..!! तुमची गोष्टच भारी. इतकं लक्षात ठेवून डायरेक्ट घरी फराळ पाठवला, त्याबद्दल एक मनसे कार्यकर्ती म्हणून खूप आनंद झाला’. विशाखाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.