हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, चित्रपट, नाटकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवणारी हरहुन्नरी अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कधी कॉमेडी रील, कधी मालिकेचे BTS व्हिडीओ तर कधी गाणे गातानाचे व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामला सत्यापित अकाउंट म्हणून ब्ल्यू टिक बॅज मिळाला आहे. पण यावरून तिच्यावर अभिनंदनाचा नव्हे तर टीकांचा वर्षाव होतो आहे.
‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ आणि अनेक मराठी चित्रपटांमधून कॉमिक भूमिका साकारत विशाखाने स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप फॉलोवर्स आहेत. साधारण एक लाखाहून अधिक असे तिचे फॉलोवर्स आहेत. अशातच आता तिच्या इंस्टाग्राम आयडीला ‘ब्ल्यू- टिक’ मिळाल्यावरुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
थेट ब्लु टिक कितीला विकत घेतलीस..? असा सवाल करत नेटकऱ्यांनी विशाखाला ट्रोल केले आहे. काही दिवसांपूर्वी विशाखाने इंस्टावर एक डान्स व्हिडिओ शेअऱ केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने ‘ब्ल्यू- टिक किती रुपयांना घेतली..? घेताना काही कमी करुन मागितले काय..?’ अशी कमेंट केली होती. यावर विशाखाने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
या कमेंटवर रिप्लाय करताना तिने लिहिलंय, ‘नाही हो…नेमकी विकत देत होते त्याच्या आदल्या रात्री ब्लू टिक मिळाली. सुदैवी नाहीतर उगाचच पैसे खर्च करावे लागले असते…thank god आणि हे insta वाले काहीच कमी पण नाही ना करत.. पण काय झालंय महिना तोच असल्याने गैरसमज होऊ शकतो…हा आत्ता विकत घेतली नाही ह्याचा पुरावा उभा नाही करु शकत तुमच्या कोर्टात…त्यामुळे जे घडलं ते मी आणि insta आम्हालाच माहीत आणि हे सत्य मी गीतेवर हात ठेवून सांगायला तयार आहे…बाकीं आपणास काय समजायचं ते समजा’.
याशिवाय फ्रेंडशिप डेदिवशी तिने गाणे गातानाचा व्हिडीओ शेअर केलेला. यावरही एकाने म्हटले, ‘इंस्टाग्रामवाल्यांच्या चेहऱ्यावर पैसे फेकून तुला ब्लू टिक मिळाल्याची बातमी अलीकडेच कुठेतरी वाचली. जर हे खरे असेल, तर तुम्ही शापित व्हावे. हाच पैसा रस्त्यावरच्या गरिबांना दिला तर मला अभिमान व्यक्त करायला आनंद वाटला असता. यावरही विशाखाने ‘कोण म्हणालं हे..? मी पैसे देऊन blue टिक घेतली नाहीये’. ब्ल्यू टिक मिळाल्यापासून विशाखाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे आणि एक सेलिब्रिटी म्हणून ही तिच्यासाठी अत्यंत दुःखद बाब आहे.