प्रशांत दामले यांना ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार’ जाहीर; रंगभूमीवरील योगदानासाठी होणार सन्मान


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते प्रशांत दामले यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी अशी आनंदाची बातमी आहे. मराठी रंगभूमीवरील सर्वात महत्वाचा आणि मानाचा समजला जाणारा ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार’ यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. प्रशांत दामले यांना रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोशल मीडियावर हि माहिती पसरताच चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

अभिनेते प्रशांत दामले हे नाट्य अभिनेते म्हणूनच नव्हे तर नाट्य निर्माते म्हणूनदेखील कार्यरत आहेत. मराठी रंगभूमीची गेली अनेक वर्ष त्यांनी अविरत सेवा केली आहे आणि अजूनही करत आहेत. त्यांना दिला जाणारा ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार’ याचे स्वरूप गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे काहीसे आहे. येत्या ५ नोव्हेंबर २०२३ रोजी अर्थात ‘रंगभूमी दिन’दिवशी हा पुरस्कार रंगभूमीला वाहून घेतलेल्या प्रशांत दामले यांना दिला जाणार आहे.

अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगली यांच्या वतीने गेल्या ५६ वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील विविध कलाकारांना हा पुरस्कार दिला गेला आहे. हा पुरस्कार देऊन या कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे. याच पुरस्कारावर आता प्रशांत दामले यांच्या नावाची मोहोर उमटली आहे. प्रशांत दामले यांनी मराठी रंगभूमीवर १९८३ साली आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. ‘टूरटूर’ या नाटकापासून ते ‘मोरुची मावशी’ आणि आता ‘सारखं काहीतरी होतंय’ ते ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ अशी अनेक नाटकं त्यांनी रंगभूमीवर गाजवली आहेत. मुख्य म्हणजे एका नाटकाचे १२ हजार ५०० प्रयोग करणारा रंगभूमीवरील एकमेव कलावंत अशी त्यांची आज ओळख आहे.