धमाल ऑफर ‘त्याच्या’साठी!! ‘बाईपण भारी देवा’ बघा फक्त 100 रुपयांत; सविस्तर जाणून घ्या


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस नुसता दणाणून टाकला आहे. बघता बघता हा चित्रपट महाराष्टाच्या बाहेरही चांगला प्रतिसाद मिळवताना दिसतोय. महिला प्रेक्षकांनी तर या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांची गर्दी दिसते आहे. अजूनही हा चित्रपट थिएटर गाजवतो आहे. अशातच आता सिनेमाच्या मेकर्सने प्रेक्षकांसाठी एका खास ऑफरचे नियोजन केले आहे. महिलांसोबत पुरुशानीही हा चित्रपट पाहावा म्हणून दिग्दर्शक केदार शिंदेंनी आवाहन देखील केले आहे.

या ऑफरबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि, ‘हा सिनेमा “तीने” डोक्यावर घेतला. पण खरतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय… ११ ऑगस्टपासुन बाईपण भारी देवा कोणत्याही थिएटरमध्ये फक्त १०० रुपयात बघता येईल!!’

‘बाईपण भारी देवा’च्या भव्य यशानंतर आता प्रेक्षक सिक्वलची वाट बघत आहेत. मध्यंतरी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथाकार वैशाली नाईक आणि या चित्रपटासाठी काम केलेला लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार ओंकार दत्त यांच्यासोबत केदार शिंदे एकत्र दिसत होते. या फोटोसोबत ‘एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी..’ असं कॅप्शन केदार यांनी दिलं होत. या फोटोमुळे बाईपण भारी देवाचा सिक्वेल येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. पण तशी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.