‘बॉईज 4’च्या टीमकडून प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट; फक्त 99/- रुपयांत पाहता येणार सिनेमा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांचे लाडके धैर्या, ढुंग्या आणि कबीर हे अलीकडेच ‘बॉईज ४’च्या माध्यमातून त्यांच्या भेटीला आले. यावेळी त्यांच्या गँगमध्ये ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळेदेखील सामील झाले. शिवाय या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची दमदार फळी, जबरदस्त कथानक आणि धम्माल कॉमेडी यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

अशातच ‘बॉईज 4’च्या टीमने दिवाळीनिमित्त प्रेक्षकांसाठी खास ऑफर आणली आहे. आतापर्यंत ज्या प्रेक्षकांनी ‘बॉईज 4’ हा सिनेमा पाहिलेला नाही त्यांच्यासाठी दिवाळीचं गिफ्ट म्हणायला हरकत नाही. ‘दिवाळी स्पेशल ऑफर!!! एजॉय करा ‘बॉईज ४’ आता फक्त रु ९९/ – मध्ये… अशी घोषणा करत ‘बॉईज 4’ या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना मनोरंजनाचा सुखद धक्का दिला आहे. चित्रपटाच्या टीमने घोषणा केल्याप्रमाणे हा सिनेमा आता प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयात बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यांनी पाहिला नाही त्यांना ९९ रुपयात ‘बॉईज ४’ पाहण्याची खास संधी आहे.

याशिवाय ‘बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार! सुपरहिट ‘Boyz4′ ची धमाकेदार कमाई..’ या कॅप्शनसह टीमने चित्रपटाचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट शेअर केला आहे. त्यानुसार ‘बॉईज 4’ ने ४.२० कोटीची कमाई केली आहे. तरीही ‘बॉईज ४’ला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही, हे स्पष्ट दिसत आहे. तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरू शकलेला नाही.