महेश मांजरेकरांनी सावरकरांवरील चित्रपट का सोडला..?; जाणून घ्या कारण


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात अनेक दर्जेदार कलाकृती देऊन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर कायम चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक सिनेमाचा समावेश आहे. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महेश मांजरेकर यांनी हा चित्रपट काही कारणास्तव सोडल्याचे समजत आहे.

इतके दर्जेदार सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांनी हा सिनेमा का सोडला..? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे. दरम्यान एका नामवंत वृत्त वाहिनीला मुलाखत देताना स्वतः महेश मांजरेकर यांनी याबाबत खुलासा केला आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक करणार होते. होते म्हणायचे कारण म्हणजे आता ते दिग्दर्शनचं काय तर या प्रोजेक्टचा भाग नाहीत असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर म्हणाले, ‘मी या चित्रपटाचा खूपच गांभीर्यानं विचार करत होतो. मला तो काही केल्या पूर्णही करायचा होता. मात्र रणदीपनं त्याची चित्रपटातील लुडबूड काही थांबवली नाही. तो बऱ्याच गोष्टींमध्ये त्याची मतं देऊ लागला आणि मला ते खटकू लागलं. यामुळे मग मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. रणदीपनं या चित्रपटामध्ये खूप सारे बदल करण्याची सुचना केली. मला ते बदल करावेसे वाटले नाहीत. त्याच्या दृष्टीनं ते महत्वाचे होते. मुळात जर कथानकावर अमूक एखाद्या गोष्टीचा परिणाम होत असेल तर त्या बदलल्या तर आपण समजू शकतो. पण त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हटलं तरीही त्या बदलून आपण वेळ आणि पैसा दोन्हीही व्यर्थ करतो. असे माझे मत होते’.

‘सुरुवातीला रणदीपनं मला त्याच्या रिसर्चनं अन् लूक्सनं प्रभावित केले होते. मला ते आवडले देखील. तो सावरकरांच्या आयुष्यावरील त्या चित्रपटामध्ये खूपच रस घेत होता. त्यानं त्यासाठी खूप वाचनही केलं होतं. त्याला पहिला ड्राफ्ट वाचून दाखवला त्यात त्यानं काही सुचना केल्या होत्या. नंतर त्यानंतर सेकंड ड्राफ्टमध्ये काही बदल सांगितले. ते पुन्हा वाढत गेले. मग यामुळे बराच गॅप पडला. रणदीपला त्या चित्रपटामध्ये अनेक गोष्टी हव्या होत्या. त्याला हिटलरशी संबंधित काही मुद्दे आणि संदर्भ चित्रपटात घ्यायचे होते. एवढचं नाही तर त्याला इंग्लंडच्या राजाचे, इंग्लंडच्या पंतप्रधानांशी संबंधित काही गोष्टी चित्रपटात हव्या होत्या. मात्र एक दिग्दर्शक म्हणून मला त्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या नाहीत. कदाचित रणदीपनं प्रमाणापेक्षा जास्त वाचन केल्यानं त्याचा गोंधळ सुरु झाला होता. त्याचा परिणाम आमच्या नात्यावर झाल्याचे दिसून आले’.