नितीन देसाईंनी आत्महत्या का केली…? ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं हे वृत्त आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच मनोरंजन विश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली शेवटची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

‘मिट्टी से जुडे हैं.. मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी’, असं म्हणत नितीन यांनी हॉटस्टारवर येणाऱ्या महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर २६ जानेवारी रोजी पोस्ट केला होता. यानंतर त्यांनी कोणतीही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे मृत्यूपूर्वीची हीच पोस्ट त्यांची शेवटची ठरली. नितीन देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून नितीन यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण करीत १९८७ साली चित्रपटसृष्टीत आपल्या कौशल्याची कारकीर्द सुरु केली. चित्रपटसृष्टीत त्यांनी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं आणि २००५ साली कर्जतमध्ये त्यांनी स्वतःचा एन. डी. स्टुडिओ उभा केला. याच स्टुडिओमध्ये आज त्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा अंत केला आहे. नितीन देसाई यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं..? याच उत्तर अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. प्राथमिक अंदाजानुसार, नितीन यांनी आर्थिक अडचणींना त्रासून आत्महत्येचं पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. नितीन यांनी आपल्याच स्टुडिओत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. हि बाब संपूर्ण चित्रपट सृष्टीसाठी मोठा चटका लावणारी आहे. एका प्रसिद्ध कला दिग्दर्शकाने अशी आत्महत्या करणे, खूप गंभीर बाब आहे. जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, प्रेम रतन धन पायो अशा अनेक हिट चित्रपटांसाठी नितीन यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. शिवाय अनेक ऐतिहासिक मालिका व महानाट्यांसाठीदेखील त्यांनी उभारलेले सेट कायम चर्चेचा विषय राहिले आहेत.