जोशींचा बाप्पा पंचधातूचा का असतो..?; स्वप्नील म्हणाला, ‘गर्दीत गणपतीला धक्का लागतो..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दीड दिवसाचा बाप्पा दरवर्षी विराजमान होतो. यंदाही स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते. दीड दिवसानंतर परंपरेनुसार स्वप्नील जोशीने कुटुंबियांसह बाप्पाला निरोप दिला. नुकताच त्याने लालबागच्या राजाचा आशीर्वाद देखील घेतला. दरम्यानचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण स्वप्नील जोशीच्या घरातील बाप्पा फार खास असतो. त्याने घरगुती बाप्पाच्या खासियतीविषयी बातचीत केली आहे.

सोशल मीडियावर स्वप्नील जोशीने घरगुती गणपती बाप्पाच्या आगमनापासून, पूजाविधींपर्यंत ते विसर्जन करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये आपण स्वप्नीलच्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पाचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहू शकतो. सालाबादप्रमाणे यंदाही स्वप्नीलच्या घरी दीड दिवस गणपती बाप्पाचे कोडकौतुक करण्यात आले. स्वप्नीलच्या घरी विराजमान होणाऱ्या बाप्पाची मूर्ती ही पंचधातूची असते. यामागील कारण विचारले असता स्वप्नीलने सांगितले, ‘सुरुवातीला आम्ही मातीचा गणपती बसवायचो त्यानंतर शाडूचा गणपती बसवायला सुरुवात केली. एका वर्षी आम्ही गणपती विसर्जनासाठी गेलो होतो तेव्हा काही लोकांनी मला ओळखलं. मला भेटण्यासाठी लोकांची गर्दी जमली. त्या गर्दीत गणपतीला धक्का लागतो की काय असं वाटलं’.

‘गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही घरी आलो तेव्हा बाबा म्हणाले, लोक तुला भेटायला येतात त्यांना फोटो काढायचे असतात त्यांच तुझ्यावर प्रेम आहे. पण बाप्पाची मुर्ती हातात असताना आपण त्या धक्काबुक्कीचा चान्स घेऊ शकत नाही. त्यानंतर बाबांनी विचार केला आपण गणपतीची पंचधातूची मूर्ती आणू. बाप्पा ३६५ दिवस घरीपण राहतील आणि सुरक्षितताही सांभाळली जाईल. गेली ८ ते १० वर्ष आमच्याकडे गणपती बाप्पाची पंचधातूची मूर्ती आहे. त्याला आम्ही चांदीचं पॉलिश करतो. या पंचधातूच्या मूर्तीच प्रातिनिधीत स्वरुपात आगमन होतं आणि प्रातिनिधीक स्वरुपात विसर्जनही होतं. त्यानंतर ती मूर्ती धूऊन पूसून परत घरात ठेवली जाते’.