‘TRP नाही म्हणून मालिका बंद करायची ताकद वाहिन्यांकडे…’; मराठी दिग्दर्शकाने व्यक्त केली मनातील सल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात ‘झी मराठी’ वाहिनीवरील बऱ्याच मालिका केवळ टीआरपी नसल्यामुळे बंद करण्यात आल्या. यांमध्ये ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेचा समावेश आहे. हि मालिका २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. मात्र पुरेसा प्रेक्षक न मिळाल्यामुळे मालिकेला टीआरपी काही लाभला नाही. दरम्यान फक्त आणि फक्त ६ महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्माते आणि वाहिनीने घेतला. याच मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी अखेर आज मनातली सल बोलून दाखवली आहे.

अलीकडेच साने गुरुजींवर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान ‘यशोदा’ मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी ‘आमची मालिका बंद झाली पण, हा नव्याने प्रदर्शित झालेला चित्रपट नक्की पाहा’ असं आवाहन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. जी तुफान चर्चेत आली आहे. विरेंद्र प्रधान यांनी हि पोस्ट शेअर करताना लिहिलं, ‘श्यामची आई हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. माझ्या मते काही पुण्यकर्मे जर आपल्याला करायची असतील, त्यांनी आवर्जून हा चित्रपट पहावा. आपल्या आजी-आजोबांना, आई-वडिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना दाखवावा. मी ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका करायचा प्रयत्न केला परंतु, पुरेसा प्रेक्षक वर्ग न मिळाल्यामुळे, मालिका अर्ध्यावर बंद करावी लागली. परंतु, या चित्रपटाबद्दल असे होऊ नये’.

‘टीआरपी नाही म्हणून मालिका बंद करायची ताकद जशी वाहिन्यांना असते तशी असे चित्रपट, नाटक, मालिका पुढील पिढ्यांपर्यंत राखून ठेवायची ताकद प्रेक्षकांमध्ये यायला हवी. चांगलं बघायला मिळत नाही अशी नेहमी ओरड ऐकू येते. मग जे चांगलं आहे ते टिकवायचे पुण्यकर्म आपल्या हातून व्हावे. दीपावली आहे. आनंद घ्या, आनंद वाटा. आपल्या मुलांसाठी हे आवश्यक आहे. त्यांनी उत्तम माणूस होण्यासाठी, या देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी, हा संस्कारांचा अग्निहोत्र पाहिला पाहिजे. मनात रुजवला पाहिजे. जात-धर्म या पलिकडे जाऊन ही आई आणि मुलाची सुंदर गोष्ट पाहिली पाहिजे. साने गुरुजी, साधना प्रकाशन, सुधाताई साने यांच्या पुण्यकर्माने, आशिर्वादाने हा चित्रपट घराघरांत पोहोचावा. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि टीम यांना उदंड यश लाभो. शुभ दीपावली’. विरेंद्र प्रधान यांनी आतापर्यंत ‘उंच माझा झोका’, ‘स्वामिनी’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची’, ‘भाग्यविधाता’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.