‘बाई घर चालवू शकते आणि…’; झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘जगद्धात्री’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका वेगवेगळ्या कारणांमुळे ऑफ एअर गेल्या. यातील काही मालिकांचे कथानक पूर्ण झाले तर काही मालिकांना केवळ टीआरपी कमी असल्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. यानंतर आता लवकरच झी मराठीवर काही नव्या मालिका सुरु होणार आहेत. अलीकडेच ‘पारू’, ‘शिवा’ या मालिका आणि ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या रिऍलिटी शोची घोषणा झाली. यानंतर आणखी एका नव्या मालिकेची घोषणा झाली असून त्याचा पहिला प्रोमो व्हायरल होतो आहे.

या प्रोमोमध्ये एका स्त्रीच्या आवाजात सांगितले आहे कि, ‘बाई घर चालवू शकते आणि गरज पडली तर देशाचं रक्षण सुद्धा करू शकते.. दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी ‘जगद्धात्री’ लवकरच झी मराठीवर’. एकंदरच हा टिझर व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येत कि, हि मालिका एका अशा स्त्रीच्या आयुष्याभोवती फिरणारी आहे जी संसार आणि देशाची बॉर्डर दोन्ही सांभाळते आहे. कुटुंबावर माया आणि देशावर प्रेम करणाऱ्या ‘ती’ची गोष्ट या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘जगद्धात्री’ या मालिकेविषयी अधिक सांगायचं झालं तर, हि नवी मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. ‘झी बांगला’वरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘जगद्धात्री’ या मालिकेचा हा मराठी रिमेक आहे. तसेच झी मराठीवर येऊ घातलेल्या ‘पारू’ आणि ‘शिवा’ या नव्या दोन्ही मालिकादेखील इतर भाषेतील दोन मालिकांचा रिमेक आहे. यातील ‘पारू’ हि मालिका तेलुगू मालिका ‘मुद्धा मंदारम’चा तर ‘शिवा’ हि मालिका ओडिया मालिका ‘सिंदूरा बिंदी’चा रिमेक असल्याचे समोर आले आहे.