हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक दररोज न चुकता पाहतात. पण तरीही गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील काही मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या मालिकांची नावे समोर आल्यानंतर आता आणखी एक मालिका बंद होणार असल्याचे समोर येत आहे. हि मालिका म्हणजे शिवानी बांवकरची ‘लवंगी मिरची’. या मालिकांचा टीआरपी कमी असल्यामुळे या मालिका बंद होत आहेत अशी माहिती मिळत आहे.
झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बांवकर घराघरात पोहोचली. हि मालिका २०१७ साली सुरू झाली होती आणि या मालिकेने २०१९ पर्यंत लोकप्रियता अन टीआरपी कायम राखली. यानंतर शिवानीची ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ आणि ‘कुसुम’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. पण या मालिकांनी लवकर आपला गाशा गुंडाळला. यानंतर आता शिवानीची ‘लवंगी मिरची’ ही तिसरी मालिका आहे, जी अल्पावधीतचं केवळ टीआरपी कमी असल्यामुळे बंद होत आहे.
खरंतर शिवानी बांवकरची ‘लवंगी मिरची’ ही मालिका सुरु झाली तेव्हा प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस पडत होती. यामुळे मालिकेकडून आशा वाढल्या. पण पुढे मालिकेचा टीआरपी घसरला आणि परिणामी हि मालिका देखील बंद करण्याचा निर्णय मेकर्सने घेतला आहे. ‘लवंगी मिरची’ हि मालिका १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरु झाली होती. यानंतर अवघ्या ५- ६ महिन्यात ही मालिका बंद होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.