‘दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका’; ‘पारू’ आणि ‘शिवा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि प्रेक्षकांचे नाते फार घट्ट असते. एखादी मालिका, त्याचे कथानक आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याचे सोबती कधी होऊन जातात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. काही मालिका तर अशा असतात कि निरोप घेताना प्रेक्षकांचे डोळे ओले करून जातात. झी मराठी हि अशी वाहिनी आहे त्यावरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत आणि अशातच आणखी २ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘पारू’ आणि ‘शिवा’ अशी या मालिकांची नाव आहेत.

मुख्य सांगायचे म्हणजे, ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिका असून यातील मध्यवर्ती भूमिकेत दोन नव्या नायिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेचे पहिले प्रोमो समोर आले. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यानंतर आता नव्या प्रोमोमध्ये या मालिकेत मुख्य भूमिकेत कोणत्या अभिनेत्री झळकणार हे समोर आले आहे. ‘माणुसकीला जपणारी, आपुलकीने वागणारी, नितळ पारू जणू झुळझुळणारा अवखळ झरा… अशी ओळख करून देताना मनसोक्त हसणारी ‘पारू’ या भूमिकेत ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्री अभिनेत्री शरयू सोनावणे दिसणार असल्याचे समोर आले आहे.

तर ‘अन्यायाला भिडणारी.. हक्कासाठी लढणारी.. निडर शिवा जणू धगधगता पेटता निखारा..’ अशी ओळख करून देताना बिनधास्त जगणारी ‘शिवा’ या भूमिकेत ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत वैदेही हि भूमिका साकारलेला अभिनेत्री पूर्वा फडके दिसते आहे. या दोन मालिकांमधून ‘दोन भिन्न स्वभाव आणि दोन नव्या गोष्टी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांचे पहिले इंट्रो प्रोमो जरी समोर आले असले तरीही अजून या मालिका नेमक्या केव्हापासून सुरु होणार काही समोर आलेले नाही. आता अभिनेत्रीची ओळख समोर आणल्यानंतर चाहते या मालिकांबाबत उत्सुकता दर्शवत आहेत.